“नवी मुंबई : प्रतिनिधी”
नवी मुंबई, दि. 21 एप्रिल (विमाका) : महिलांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी ‘राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिला जनसुनावणी आयोजित करण्यात आली. या जनसुनावणीत विविध प्रकारच्या एकूण 28 प्रकरणांवर सुनावणी पूर्ण झाली. तसेच उर्वरित प्रकरणांवर येत्या आठ दिवसात निराकरण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
“राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई बेलापूर येथील सिडको भवन येथे ही जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महिला आयोग अतिरिक्त सचिव राधिका चक्रवर्ती, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि तक्रारदार महिला उपस्थित होत्या.
“महिलांचा कायदा व प्रशासनावर विश्वास वाढविणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून अशा उपक्रमांमुळे महिलांना न्याय मिळण्यास मोठी मदत होईल.” – विजया रहाटकर
या जनसुनावणीसाठी 63 अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये 28 नोंदणीकृत तक्रारी आणि वॉक-इन स्वरूपातील 35 नवीन तक्रारींचा समावेश होता. त्यापैकी 28 तक्रारींची सुनावणी पूर्ण झाली असून उर्वरित प्रकरणांचे निराकरण आठ दिवसांत करण्याचे निर्देश देण्यात आले. काही प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने त्यांना वेळ लागू शकतो, असेही सांगण्यात आले.

विविध तक्रारींवर कार्यवाही
या जनसुनावणीत बलात्कार/प्रयत्न-1, लैंगिक छळ-5, मारहाण-3, घरगुती हिंसाचार-14, हुंडाबळी छळ-3, सायबर गुन्हा-1 आणि अपहरण-1 अशा विविध 28 तक्रारींवर प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आली.
दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे आणखी 35 महिलांनी उपस्थित राहून तक्रारी नोंदवल्या. यामध्ये विशेषतः घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये समुपदेशन आणि मध्यस्थीच्या माध्यमातून वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
[येथे संबंधित बातमी वाचा]- https://navimumbaiheadlines.com/women-issues-navi-mumbai
कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
महिलांच्या संरक्षणासाठी कायदे सक्षम असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे रहाटकर यांनी नमूद केले. स्थानिक यंत्रणांनी वेळेत न्याय दिल्यास अशा विशेष उपक्रमांची गरज कमी भासेल, असेही त्यांनी सांगितले.
महिलांचा कायदा व प्रशासनावर विश्वास वाढविणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी उपक्रमामुळे महिलांना न्याय मिळण्यास मोठी मदत होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

कोकण विभागाचा आढावा
याच दिवशी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कोकण विभागाचा सर्वंकष आढावा घेतला. केंद्र व राज्य शासनाच्या महिलाकेंद्रित योजनांची अंमलबजावणी, तांत्रिक अडचणी आणि प्रशासनिक बाबींचा आढावा घेण्यात आला.
राष्ट्रीय गुन्हे नोंदवही (NCRB) नुसार महाराष्ट्रात महिलांविरुद्ध गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्याचे निर्देश दिले.
महिलांच्या तक्रारींचे त्वरित निवारण व्हावे यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस महिलांसाठी राखून ठेवावा, तसेच ‘वन स्टॉप सेंटर’ आणि विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
[अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा] https://divcomkonkan.gov.in/
महिलांच्या सहाय्यासाठी आयोगाची 24×7 हेल्पलाईन ‘14490’ कार्यान्वित असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.







