नवी मुंबई | प्रतिनिधी
लाइव्ह शो, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा स्पर्धा आणि मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्र म्हणून नवी मुंबई पुढील काही वर्षांत देशाच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासाठी सिडको (CIDCO) कडून एक भव्य मल्टी-पर्पज एरिना प्रकल्प उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे नवी मुंबई एंटरटेनमेंट हब म्हणून विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या एरिनामध्ये लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट्स, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव, प्रदर्शनं तसेच मोठ्या कॉर्पोरेट इव्हेंट्स आयोजित करता येणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही सुविधा एकाच छताखाली विविध प्रकारच्या कार्यक्रमांसाठी वापरता येईल, अशी रचना करण्यात येणार आहे.
सिडकोच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे केवळ मनोरंजन क्षेत्रालाच चालना मिळणार नाही, तर पर्यटन, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. देश-विदेशातील कलाकार, खेळाडू आणि आयोजकांना आकर्षित करणारी ही एरिना नवी मुंबईच्या विकासात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
विशेष म्हणजे, आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, उत्कृष्ट दळणवळण व्यवस्था आणि नियोजित शहररचना यांचा लाभ या प्रकल्पाला होणार आहे. त्यामुळे मुंबईवरील वाढता ताण कमी करत, नवी मुंबई स्वतंत्रपणे एक मनोरंजन आणि कार्यक्रमांचे केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सिडकोच्या या एरिना प्रकल्पामुळे नवी मुंबई केवळ निवासी व आयटी हबपुरती मर्यादित न राहता, देशातील प्रमुख एंटरटेनमेंट डेस्टिनेशन म्हणून उदयास येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
📍 नवी मुंबईच्या प्रत्येक घडामोडीची माहिती
👉 Navi Mumbai Headlines WhatsApp Channel वर मिळवा.
📰 स्थानिक बातम्या | अपडेट्स | Breaking News
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb6cWIaEwEk2MeomVG14